खरंतर स्त्रीच्या आयुष्यात बंधने ही तीच्या जन्माला येण्यापूर्वीच घातली जातात आणि पुढे कालांतराने बदलली जातात. वेगवेगळ्या पद्धतीची बंधने वेळेप्रमाणे आणि तीच्या वयाप्रमाणे परिस्थिती नुसार, समाजानुसार आणि पारीवारीक स्थीतीनुसार घातली जातात.
सर्वात पहिले बंधन मुलीच्या जन्म घेण्यावरच असते. आजच्या काळात ही प्रथा कमी झाली असली तरी पूर्णपणे संपलेली नाही. आजही बरेच ठिकाणी स्त्री च्या जन्म घेण्यावर बंधन घालण्यात येते.
स्त्री च्या आयुष्यात बंधने ही जन्मापासून ते मरेपर्यंत असतातंच, जन्म झाला की आई-वडिलांचे ऐकावे लागते, लग्न झाल्यानंतर सासरच्यांच आणि त्यानंतर मुलांच त्यामुळे स्त्रीला आपल्या मनासारखं आयुष्यं कधीच जगण्याची संधी मिळत नाही. कुठल्याही स्त्रीला मग ती गृहीणी असो वा नोकरी करणारी तडजोड मात्र करावीच लागते, आणि बंधने दोन्हीकडे असतात पण वेगवेगळी. आधी जन्म घेण्यावर बंधन, मग शीक्षणावर, त्यानंतर नोकरी-व्यवसाय निवडण्यावर, लग्न करण्यावर, सासरी जांच सहन करण्यासाठी बंधन , म्हातारपणी इच्छा नसतानाही वृद्धाश्रमात राहण्यासाठी बंधन अशाप्रकारे संपूर्ण आयुष्य बंधनांखाली घालवतांना आयुष्य जगायचं आणि आयुष्यात आनंदी राहायचं राहूनच जातं.
प्राचीन काळापासून निरनिराळ्या प्रकारच्या बंधनात आपण जगत असतो. पण काहींची आपल्याला सवय झालेली असते म्हणून आपणही दुर्लक्ष करतो. कारण ती बंधन आहेत हेच आपल्याला माहीत नसते. लहाणपणापासूनच इथे जाऊ नये-तिथे जाऊ नकोस, मुलीच्या जातीला एवढे हसु नये बरं दिसत नाही, एवढं खाऊ नये वजन वाढते मग लग्न कसं होणार, बाहेर मुलांबरोबर खेळू नये, एवढं शिक्षण पुरे उद्या सासरी जायचं आहे घरातील कामे शिकावी, लग्न झाल्यानंतर सासरच्यांनी त्रास दिला तर सासरची मंडळी आहेत बोलणारंच बाईने ऐकून घ्यायला हवं अशाप्रकारे अनेक प्रकारे बंधन घालण्यात येतात जी आपल्याला माहीत नसतात.
मुलगी मोठी झाल्यावर तिच्या प्रत्येक गोष्टींवर सगळ्यांची मते तयार असतात. तिच्या दिसण्यावर, हसण्यावर, खाण्यावर, वागण्यावर उदाहरणार्थ -असे कपडे घालू नको, तसे केस कापू नकोस, एवढा मेकअप लाऊ नको, मुलांशी मैत्री करु नको, जास्त हसू नको, हा विषय निवडू नको असे अनेक बंधन मुलींना पाळावे लागतात. पण का ? हा प्रश्न कुणीच विचारत नाही, काय होते खुश राहिल्यास, काय होते चांगले कपडे घातल्यावर, का मोजकेच जेवावे आणि तो प्रत्येक क्षण जो आपल्याला आनंदच देतो त्याने कुणाचं काय वाईट होतं. ही बंधने उगाचच परंपरागत पद्धतीने चालत येतात आणि पुढे चालत राहतात कारण कुणी त्यांना तोडण्यासाठी विचार करत नाही.
बंधने ही तोडण्यासाठीच असतात
हो हे अगदी योग्य आहे. आपल्या इतिहासात अनेक महिला अशा आहेत ज्यांनी अनेक दु:ख सहन करून बऱ्याच मर्यादा आणि बंधने तोडून समाजातील लोकांना नवीन दृष्टीकोन मिळवून दिला. सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या नियमांविरुद्ध जाऊन स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, आनंदीबाई पहिल्या महिला डॉक्टर झाल्या नोकरी मिळवून दिली, घरच्यांच्या विचार न करता कल्पना चावला अंतरीक्षात जाऊन आपल्याला भरारी घ्यायला शिकवले, गानकोकिळा लताबाईनी लग्न न करता काम केले या सगळ्यांनी समजावलं की बंधन हे तोडण्यासाठी असतात तेंव्हाच समाज बदलतो.
आनंदाने जगण्याची सवय करून घ्या, तुमच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली पाहिजे. तुमच्याशी वाईट वागणूक केली तर नाही म्हणायला काही हरकत नाही. मग ती सासरची मंडळी आहेत म्हणून अन्याय सहन करणं चुकीचं आहे तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रयत्न करणे काही चुकीचे नाही. हसल्याने संकटांवर मात करण्यासाठी शक्ती मिळते म्हणून मोकळेपणाने हसायला सुरुवात करा.ध्येय कुठलंही असो आनंदी राहण्यासाठी अथवा सुंदर दिसण्यासाठी किंवा शिक्षण घेऊन उच्च पदावर बसण्यासाठी बंधने तोडून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा.
तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात ध्येय ठरवा आणि त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. उंच आकाशात भरारी घ्यायला शिका कारण जो समाज बंधन तोडताना विरोध करतो, तोच ध्येय गाठल्यावर नमनही करतो.तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा, आपण जे करतोय ते योग्य आहे.
बंधने तोडणे आणि गैरव्यवहार
बंधने ही तोडण्यासाठीच असतात परंतु नक्की कुठलं बंधन तोडायचं आणि कशासाठी हे तुम्हाला कळायला हवं. नुसतं बंधन तोडायचं म्हणून गैरव्यवहार करून इतरांना त्रास होईल आणि स्वतःला नूकसान होईल असे वागणे चुकीचे आहे. बंधन तोडायचं ते स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी आणि स्वतःला इतरांपेक्षा उच्च स्थान मिळवून घेण्यासाठी . उगाच अव्यवहारीकपणा करून स्वतः चे आयुष्य खराब करून घेणे याला अर्थ नाही.
उदाहरणार्थ- रात्री बाहेर जाणे योग्य वाटत असेल तर स्वतःच संरक्षण करण्याची ताकद आणि तयारी तुमच्यात असायलाच हवी. उगाच बंधन तोडायचं आणि ताकद नसतानाही स्वतःवर संकट ओढवून घ्यायचं ह्याला अजिबात अर्थ नाही. आपल्याला एखादे कार्य करायचे असेल तर त्यासाठी कष्ट करा, मेहनत घ्या समोर आलेल्या संकटाला कुणाच्याही मदतीशिवाय दोन हात करता येईल अशी स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित करा . स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे तयार करून मगच रणांगणात उतरा अर्थात पुढे चला. कारण तुमच्या आयुष्यात आनंद वाढवायचा की संकटे हे तुमचं तुम्हालाच कळायला हवं.
आयुष्य एकदाच मिळतं त्याला खराब करायचे की इतरांपेक्षा जास्त उंच आणि समृद्ध बनवायचे हे ठरवा. आत्मविश्वास असणे योग्य मात्र अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना निट काळजीपूर्वक घ्यावा. बंधने तोडून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. बंधने तोडण्यासाठीच असतात , स्वतःला घडवण्यासाठी असतात, आनंदाने गगनात भरारी घेण्यासाठी असतात.
तर तुम्ही कुठल्या ध्येयासाठी बंधन तोडायचं ठरवलं आहे ? नक्की सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा