मैत्रीणींनो आपण लहानपणापासून बघत आलोय कि पूर्वीच्या काळात पाळी आल्यावर घरातील बायकांना वेगळ बसवलं जायचं , आणि आजच्या काळात वेगळ बसवत नाहीत पण काही विशेष गोष्टींवर आणि कामांवर बंधने घालून दूर ठेवण्यात येते. जसे देवाची पूजा, स्वयंपाक करणे, घरातील वस्तुंना स्पर्श न करणे आणि इतर काही गोष्टींवर बंधन. परंतू पाळीच्या दिवसांत घरातील बाईला किंवा मुलींना असे का करावे लागते , बाजूला का बसवले जाते, याचे कारण किंवा उत्तर तुम्हास माहीत आहे का ? कदाचित नाही. कारण आजपर्यंत आपल्याला फक्त हेच शिकवले जाते कि पाळीच्या दिवसांत देवाला आणि स्वयंपाकाला लागालागी करायची नाही त्याने पाप लागेल किंवा विटाळ होईल अथवा देवाचा अपमान होईल. पण हे योग्य आहे का, ही परंपरागत चालत आलेली पद्धत फक्त याच कारणास्तव आहे की इतर काही कारण असेल. चला जाणून घेऊया.
प्राचीन काळात पाळीच्या दिवसांत वेगळं बसण्याची कारणे.
खरंतर ही परंपरा अगदीच प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, मग पुर्वीच्या लोकांनी ही परंपरा का सुरू केली असेल. आपले पूर्वज फार हुशार होते ,ते प्रत्येक गोष्टींचा विचार करून आणि भविष्यातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करून निर्णय घेत होते.प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ नक्कीच असतो. परंतु तो समजून घेतल्याशिवाय कळत नाही.
पुर्वीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते , त्यामुळे बायकांना अतिशय शारीरिक मेहनत करावी लागत होती. जसे सकाळी लवकर उठून विहिरीतून पाणी भरणे, रोज जात्यावर दळून पीठ बनवणे कारण तेंव्हा गिरण्या नव्हत्या, सर्व घर शेणाने सारवणे कारण तेंव्हा मातीची घरे होती , लाकडे आणून चूलीवर स्वयंपाक बनवने, धुणी-भांडी, त्याचबरोबर शेतीची सर्व कामे कारण तेंव्हा कुठल्याच सुवीधा उपलब्ध नव्हत्या. अशाप्रकारे दिवसभर मेहनत करावी लागत असे.आणि पाळीच्या दिवसांत कपडा वापरावा लागत असे, जेणेकरून वारंवार त्याला बदलल्याशिवाय पर्याय नसायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत अतिशय शारीरिक मेहनत केल्याने पाळीच्या दिवसांत शारीरिक थकवा जाणवला तर इलाज करण्यासाठी तेंव्हा डॉक्टरही नव्हते. दिवसभर मेहनत आणि सुखसोईंचा अभाव या कारणांमुळे त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल म्हणून पाळीच्या दिवसांत चार दिवस वेगळ्या खोलीत घराबाहेर राहण्याची सोय केली. ज्यामुळे बायकांना पाळीच्या दिवसांत कुठल्याच प्रकारची मेहनत करायला लागू नये, त्यांना पूर्णपणे आराम मिळेल. अंधारात ठेवून त्यांना पुरेपूर शांती आणि आराम मिळावा,ज्यामूळे पाळीत होणारे त्रास जसे पोट दुखणे, सांधेदुखी, मळमळ अशा विविध त्रासातून आराम मिळेल. याकाळात महिला आजिबात घरात प्रवेश करत नसत. फक्त आराम करायच्या हेतूनेच ही परंपरा केवळ बायकांच्या आरोग्यविषयक दृष्टीकोनातून निर्माण करण्यात आली होती, यात कुठल्याच बाबतीत अशुद्धता किंवा दैवीक गोष्टींचा समावेश नव्हता.
आजच्या काळात पाळीच्या दिवसांत बायकांचे नियम.
कुठलीही परंपरा डोळे बंद करून पाळायची हा आपला स्वभाव आहे.मग ती का सुरू झाली, काय उद्देश होता , त्याचा अर्थ काय हे माहीती करुन घेण्यास कुणाला वेळ नसतो .
काळ बदलला तर गोष्टींवर बदल होतो. प्राचीन काळापासून चालत आलेली पद्धत कालांतराने व्यक्तीप्रमाणे आणि विचारांप्रमाणे बदलत गेली. प्राचीन काळापासून मधल्या काळात आधुनिक सुखसोई वाढल्यावर नियम बदलून बायकांना खोलीतून बाहेर काढून घराबाहेरील कामांवर लावण्यात आले.आणि याला दैवीक अथवा विटाळाचे नाव मिळाले. म्हणजे पाळीच्या वेळी घरातील स्वयंपाकघरात आणि देवस्थानी तसेच पुरुषांना स्पर्श केला तर विटाळ मानलं जाई. बायकांना घरातील कामे करण्यास मनाई होती पण घराबाहेरील सगळी कामे करावी लागत असत.कारण बाहेरील कामाला स्पर्श केला तर हरकत नसायची. मग ते शेतात धान्य काढायला असलं तरी. ( स्वयंपाक घरात स्पर्श चालत नाही, परंतु धान्याला चालतो. )
नंतर आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि फ्लॅटसिस्टीम आली ज्यामुळे जागेची कमी भासत असल्याने महिलांचे पाळीच्या दिवसांत घरातच सगळ्याबरोबर राहणे सुरू झाले . तसेच शिक्षण घेऊन आपल्या विचारांवरही बदल झाले, त्यामुळे घरातील देवाला आणि वस्तुंना लागालागी करायची नाही पण बाकी सगळं चालतं असा नियम लागला. तसेच आजकाल लग्न झाल्यानंतर बरेचजण नोकरी-व्यवसायासाठी दोघेच राहतात. मग चार दिवस बाहेरच खायचं, पण हात लावू नये, तर काही बायका घरातील सर्व कामे करतात पण देवाला स्पर्श करत नाही असंही आहे. पण काही दुखतंय असं म्हटल्यावर दुखतच असते त्याला काय होतंय , असे उत्तर मिळते. म्हणजेच बदल घडवून आणताना मुळ उद्देश नाहीसा झाला.
तात्पर्य एवढेच की काळानुसार प्रत्येकाने आपापल्या परीने ह्या परंपरेत स्वतःला जमेल तसे बदल घडवून आणले. परंपरा मात्र तशीच चालू आहे, माहिती असो अथवा नसो आपण झालेल्या गोष्टींचे अनुकरण करत राहतो.
अशाप्रकारे महिलांच्या आरोग्यासाठी सुरू झालेली परंपरा वेगळी कारणे आणि उद्देश घेऊन आजतागायत चालू आहे. आजही बरेच ठिकाणी या सर्व गोष्टी चालल्या आहेत. सोवळे म्हणून हे नियम पालन केले जातात. विशेषतः जुन्या महिला घरामध्ये हे नियम अवश्य पाळतात. कुठलीही गोष्ट करताना ती निट समजून घेणे आवश्यक असते. आजही भरपूर महिलांना पाळीच्या वेळी पोटदुखी, मळमळ, सांधेदुखी, अंगदुखी अशा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी त्यांनी आराम मिळायला हवा, त्यामुळे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
म्हणूनच दुसऱ्याकडे लक्ष देउन आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. स्वतःची काळजी घ्या, आरोग्य जपा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा