फॅशन ही एक लोकप्रिय शैली आहे. खासकरून रुबाबदार कपडे, ॲक्सेसरीज, मेकअप, केशरचना, आणि जीवनशैली ज्यामध्ये लोक स्वतःला बाहेरील जगात उपस्थित करतात.
फॅशन म्हणजे स्टाईल किंवा ग्लॅमरस जगापेक्षा वेगळे बरेच काही, तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीत फॅशन आहे. फॅशनची व्याख्या कपडे किंवा ॲक्सेसरीज घालण्याचा मार्ग किंवा निवड म्हणून केला जातो. परंतु जे तुम्हाला दिसायला आकर्षक बनवते आणि चांगले वाटते, फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीत जसे बेडशीट, कुशन, नवीन निर्माण केलेली कुठलीही वस्तू ती फोरव्हीलर असो वा पायातली चप्पल ह्या सर्व गोष्टींचा समावेश फॅशनमध्ये होतो.
फॅशन ही ब्रॅण्ड ची नाही तर तुम्ही तुमचा पोषाख आत्मविश्वासाने कसा बाळगता यांची ओळख आहे. तुम्ही जे परिधान करता त्याने तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास येतो. फॅशनच्या नावाखाली अतेतायीपणा करणे अयोग्य आहे, प्रत्येक मुलगी किंवा महिला सुंदरच असते. खूप मेकअप करून सुंदरता नष्ट करु नका, तुम्ही बाहेर जाताना तुमच्या चेहऱ्यावर फक्त क्रीम आणि आवश्यक तेवढेच फाउंडेशन लावा किंवा क्रिम, आय मस्कारा आणि लिप बाम वापरा तुम्ही नैसर्गिकरीत्या मोहक दिसाल. फॅशन ही केवळ महिलांना सुंदर बनवण्यासाठी नाही तर त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी देखील आहे. तुम्ही जे कपडे, ॲक्सेसरीज, मेकअप, केशरचना आणि जीवनशैली वापरता त्यामुळे लोक तुम्हाला ओळखतात तुमची ओळख निर्माण केली की तुमचा आत्मविश्वास वाढतो.
तुमचा पेहरावच नाही तर तुम्ही कसे बोलता कसे वागता हे देखील महत्वाचे आहे. जर तुम्ही खूप छान वस्त्र परिधान केले आणि कठोर बोलता किंवा तुमची भाषाशैली वाईट आहे तर ते तुमचे व्यक्तिमत्व नष्ट करेल. फॅशन म्हणजे आपली ओळख दाखवने लोक सर्वप्रथम तुम्हाला पाहतात. तुम्ही काय निवडता, तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची झलक देते. तुम्ही स्वतःला इतर लोकांपेक्षा कसे वेगळे करता अथवा तुम्ही तुमच्या फॅशनद्वारे लोकांना तुमची ओळख कशी देता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
फॅशन तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणते
फॅशन आणि स्टाईल तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवून आणते, तुम्हाला पुर्णपणे बदलते तुमचा पोषाख किंवा पेहराव तुमच्या सौंदर्याचे निरनिराळे प्रकार समोर आणते, तुमचं वागणं आणि बोलणं तुमच्या फॅशनद्वारे जीवनशैलीला नवीन सुधारित पद्धतीने विकसित करते. तुमच्या दैनंदिन वस्तूंची खरेदी किंवा निवड तुमच्या राहणीमान बदलतं जसे घर, घरातील सुंदर वस्तू, बेडशीट, पडदे थोड्याच बदलांमुळे तुम्हाला जीवनामध्ये नाविण्य अनुभवण्यास मिळते. सोसायटीमध्ये तुमची नव्याने ओळख निर्माण होते , स्वतःच्या आयुष्यात नावीन्यपूर्ण बदल तुमच्या मानसिक विचारांची आणि विकासाची दिशा बदलतात . अट फक्त एवढीच आहे की फॅशन करतांना त्याची माहिती असणे आवश्यक आहे, त्याबद्दल ज्ञान प्राप्त करूनच आयुष्यात फॅशन आणि स्टाईल आत्मसात करावी अन्यथा तीच फॅशन तुम्हाला वाइटप्रकारे लोकांसमोर सादर करू शकते.
फॅशन करणे सगळ्यांनाच आवडतं, पण ती नेमकी कशी असावी हे कुणीच बघत नाही अथवा त्याबद्दल ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही. चित्रपटांमध्ये बघुन आणि आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना बघुन बाकीचे लोक जे करतात ते अनुकरण करून सुंदरता मिळवण्यासाठी प्रयत्न म्हणजे फॅशन नाही. ज्याप्रमाणे सगळ्यांची जीवन जगण्याची पद्धत म्हणजे जिवनशैली वेगळी असते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे फॅशन आणि स्टाईल मध्ये सुद्धा फरक पडतो.
तुम्ही कोणत्या प्रकारच्या कपड्यांमध्ये सुंदर दिसतात हे कळायला हवं, ज्या ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसता आणि आरामदायक असल्याची खात्री होते तेच निवडा. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळ्या पद्धतीची असते, जसे कुणी जाड, बारीक, मध्यम, उंच, बुटका, सडपातळ, गोरा, सावळा, काळा, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समान रंगाची अथवा समान प्रकारच्या पेहराव चांगले दिसणार नाही. व्यक्तीच्या शरीरयष्टी प्रमाणे कपड्यांची निवड केली पाहिजे. त्याचप्रमाणे ॲक्सेसरीज, मेकअप, केशरचना आणि इतर वस्तू स्वतःला सुट होतील अशाच निवडाव्यात. तुमची निवड तुम्हाला कशी आकर्षक बनवते हे महत्त्वाचे ठरते. तुमची फॅशन आणि स्टाईल तुमच्या आयुष्यात खूप आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या फॅशनद्वारे लोकांना तुमची ओळख करून देता. ज्यामुळे लोक तुम्हाला पसंत किंवा नापसंती दर्शवतात आणि ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व घडते. आजच्या काळात विकसित तंत्रज्ञान, विकसित गोष्टींचा समावेश आणि खुशाल आयुष्य जगण्यासाठी फॅशनमध्ये बदल करणं आवश्यक आहे. कारण आजच्या काळात लोकांना तुमची ओळख फक्त तुमच्या दिसण्यावरुन पटते. तुम्ही जेव्हढे स्टायलिश आणि प्रेसेंटेबल असाल तेव्हढेच तुमच्या दैनंदिन जीवनात फायदा होतो. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, किंवा इतर बाहेरील लोकांना तुमची ओळख तुमच्या फॅशनद्वारे होते.
तुम्ही तुमच्या फॅशनद्वारे लोकांना जिंकत असाल तर, नोकरीत वरिष्ठांना तुमच्या बरोबर काम करण्याची आवड निर्माण होते. बाहेर व्यवसाय करणाऱ्यांना लोकांवर इम्प्रेशन टाकणे सोपे होते, महिलांना स्टायलिश राहील्याने तुमच्या सौंदर्यांची चर्चा होते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. सोशल नेटवर्किंग वाढते नवीन मित्र मैत्रिणी भेटतात. बाहेरील जगात ओळख निर्माण होते. महिला बाहेर नोकरी करत असतील अथवा घरात राहणाऱ्या असोत तुमच्या फॅशनद्वारे तुम्ही तुमची ओळख निर्माण करु शकता , ही तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडवून आणते. तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करते, आयुष्यात प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
महिलांनी फॅशन कशी करावी/ स्टायलिश कसे दिसावे
प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते पण फॅशन आणि स्टाईल तुमच्या सौंदर्यात अजून भर घालते. परंतु निवड करण्यात चुकत असाल तर तुमचं सौंदर्य वाढण्याऐवजी वाईट दिसेल.
उदाहरणार्थ माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी , ऐश्वर्या आणि विद्या बालन ह्या चारही नट्या सुंदर आहेत परंतु त्यांची पर्सनॅलीटी मात्र वेगवेगळी आहे. ज्यामुळे त्यांची कपडे आणि ॲक्सेसरीज, मेकअप करण्याची पद्धत वेगळी आहे. माधुरी इंडीयन वेअरमध्ये चांगली दिसते तर राणी शाॅर्ट ड्रेसमध्ये, सौंदर्या इंडियन आणि वेस्टर्न दोन्हींमध्ये छान दिसते, तर विद्या फक्त साड्यांमध्ये. तसेच प्रत्येक स्त्री तिच्या शरीरयष्टी प्रमाणे वेगळी असते, जाड, सडपातळ, उंच,बुटकी, गोरी ,सावळी तुम्ही जशा आहेत तशा स्वतःचा स्विकार करून तुमच्या शरीरयष्टीला सुंदर बनवेल असे पोषाख, ॲक्सेसरीज आणि मेकअपची निवड केली तरच तुम्ही आकर्षक दिसाल. अथवा चुकीचे रंग आणि निवड तुमच्या सौंदर्याचे नुकसान करू शकते.
तुम्ही ज्या ड्रेसमध्ये आरामदायक अनुभव करता आणि जेव्हढी गरज आहे तेवढाच मेकअप वापरा तरच तुम्ही स्टायलिश दीसाल अथवा जास्त मेकअप, चुकीची केशरचना आणि ओव्हर ॲक्सेसरीज तुमचा लुक पुर्णपणे खराब करु शकतात.योग्य गोष्टींची निवड तुम्हाला खऱ्या अर्थाने स्टायलिश बनवण्यासाठी मदत करते.
खूप भडक कपडे आणि ॲक्सेसरीज तुमचा लुक पुर्णपणे खराब करते. लाइट आणि मेडियम कलर वापरा, खुप घट्ट कपडे न वापरता बाॅडीप्रमाणे आरामदायक आणि असभ्य दिसणार नाही ह्याची खात्री करून घ्यावी. पोषाखाला लक्षात घेऊन मेकअप व केशरचना करावी , त्याचप्रमाणे ॲक्सेसरीज निवडावी. मेकअप खुप जास्त लावू नये, चेहऱ्यावर उमटून दिसणार नाही नैचरल आणि ग्लोइंग स्कीन दिसेल अशी फीनीशींग द्यावी. स्वतःच्या उंचीप्रमाणे सॅंडलची आणि शुजची निवड करावी. प्रत्येक सिलेक्शनमध्ये कलर काॅम्बीनेशन नक्की असावं. नविन ट्रेंड प्रमाणे आलेला ड्रेस तुमच्या पर्सनॅलीटीला सुट होतो की नाही हे लक्षात घेऊन खरेदी करावी.
दुसऱ्याचं अनुसरण करणे थांबवा, स्वतःच्या पर्सनॅलीटीला जे चांगले दिसते तेच घाला आणि वापरा . स्वतःची फॅशन स्वतःच निर्माण करा. कारण तुमचे सौंदर्य तुमची ओळख आहे हे विसरून नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा