सुमन मागच्या पाच वर्षांपासून शहरात हाॅस्टेलमध्ये शिकत होती, सरकारमान्य परिक्षा उत्तीर्ण करून तिला ही संधी मिळाली होती. ती खूप हुशार आणि सुंदर होती, स्वभावाला शांत आणि गुणी मुलगी. वयापेक्षा जास्त समजदार आणि मनाने भोळी-भाबडी, कुणाचं दु:ख पाहून हळवी होणारी आणि दुसऱ्याच्या मदतीला न सांगता धावणारी, सालस आणि गोड मुलगी.
सुमनचे आई -वडिल शेतकरी होते. दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ, ती सगळ्यात लहान आणि सगळ्यांची लाडकी होती. सुमन घरी आली तेव्हा तिला घरातील कामे येत नव्हती पण हळूहळू तीने बहिणींच्या आणि आईच्या हाताखाली सगळे शिकुन घेतले. गावातील मुलींना जास्त शिक्षण घेण्याची मुभा नव्हती त्यात वडील कडक स्वभावाचे आणि जुन्या विचारसरणीचे म्हणून पुढील शिक्षण सुमन घरुनच परीक्षा देऊन पूर्ण करत होती. मग बहिणींचे लग्न झाले पण थोरल्या बहीणीला सासरी खूप छळत होते, वर्षभरात दोघींना मुलं झाली. आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या सुमनवर पडल्या. बरेच वर्षे दुर राहील्याने सुमनचा तिच्या आईमध्ये खूप जीव होता. ती आईची खूप काळजी घेत होती, तसेच बहीणीला सासरी जाच असल्याने तिला पण खूप मदत करायची. प्रत्येक वाईट प्रसंगी तिच्यासाठी धाऊन जायची, तिचे दवाखाने, बिमाऱ्या, तिच्या लहान मुलांना सांभाळणे, सासरच्या मंडळींची सेवा सगळं काही स्वतःचं घर असल्यासारखे सांभाळायची. धाकट्या बहिणीच्या घरी आल्यावर सुद्धा सगळं करायची. ती सगळ्यांची काळजी घेई पण स्वतःसाठी कधीच कुणाला काही मागायची नाही.
हळूहळू सुमनने सर्वच घर आपलंसं करून घेतलं, ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीची निट आणि प्रेमानं काळजी घेत होती. आई-वडील , भाऊ, बहिणी त्यांची मुले आणि सासरची मंडळी सगळ्यांना खुश ठेवायची. सगळ्यांसाठी दिवसभर राबराब राबायची मुलं तर त्यांच्या आईपेक्षा जास्त तिलाच प्रेम करायचे. सगळेजण तिचं भरभरून कौतुक करायचे. बहिणींना काही त्रास असेल तर त्या तीलाच हक्काने सांगायच्या, जणू ती मोठी आणि त्या लहान होत्या. तुच आमची आई आहे असं बहिणी म्हणायच्या." आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही हो सुमे, तु आमच्यासाठी किती करते". तुझं लग्न झाल्यानंतर आम्हीपण तुझं सगळं करु तु आमची खुप लाडकी आहे मुलं तर तुझ्याशिवाय राहणारच नाही, तु लग्नच नको करू बाई तुझ्याशिवाय आम्ही कसे जगणार असं गमतीने म्हणत. सगळेजण तिचं एवढं कौतुक करतात हे बघून तिचे मन आनंदाने भरून निघायचे. आणि ती म्हणायची मला काही नको तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे.
तिच्या लग्नाचा पहिल्यांदा विषय निघाला तेंव्हा आईची काळजी कोण घेणार असं बहिणींनी सुचवले, आणि तिचा त्यांच्यावर खूप विश्वास होता त्यामुळे तीच्या घरातुन जाण्याआधी मोठ्या भावाच लग्न करायचं असं ठरलं, घरात सुन आल्यावर थाटात लहान मुलीचे लग्न लाऊ असे ठरले. भावाचं लग्न झाले आणि सुमनची खरी कसोटी सुरू झाली. सुमनची वहिनी तिला खूप त्रास द्यायची पण भाऊ तिच्या मुठीत होता. तो सुमनलाच चुप रहायला सांगायचा. आईकडे विषय काढला तर ती टाळून देई, तुला उद्या सासरी जायचं थोडं समजून घे. यामुळे तिच्या वहिनीची हिम्मत अजून वाढली.शेवटी कंटाळून तिने आपल्या बहिणीला फोन केला, तिला विश्वास होता त्या तीलाच सपोर्ट करणार. परंतू असे घडले नाही बहिणी घरात येताच सरळ भावाच्या बायकोला भेटायला गेल्या तिला बघितले सुद्धा नाही. सूमन स्वतःहून भेटायला गेल्यावर तुच वाईट आहे म्हणून दोष द्यायला लागल्या. सुमनच्या काही लक्षातच येईना काय घडतंय म्हणून, ज्या मुलांना तिनं एवढी माया दिली ते तिला बोलायला तयार नव्हते. सुमन सगळ्यांची लाडकी होती ती आज अचानक नावडती झाली पण कशी तिचा विश्वासच बसेना. आपल्या बहिणी आपल्याशी अशा का वागतात तिला उमगेच ना. तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कुणीच ऐकत नव्हते.
हळूहळू सगळं बदललं आणि घरातील सर्व जबाबदारी वहीनिने घेतली, आता ती घरची मालकीन झाली. ज्या बहिणीसाठी सुमनने लहान वयात शिक्षण सोडून बहिणींना त्यांच्या वाईट काळात मदत केली. घरातील सर्व जबाबदारी पार पाडली, स्वतःचा कधीच विचार केला नाही, त्याच बहिणी आज तिला तिच्या चुका दाखवत होत्या. तिला अपशब्द बोलत होत्या. ती फक्त त्यांची मोलकरीण होती हे सांगत होत्या. तिची मदत न करता तिला छळत होत्या. सुमन खूप भोळी भाबडी होती, ती ज्यांना आपलं समजून झटत होती त्यांच्या मनात काय होते तिला कळलेच नाही. कालपर्यंत सगळ्यांची लाडकी सुमन आज पुर्णपणे एकटी पडली होती, तीच्या दु:खात तीला आपलं समजून जवळ घेणारं कुणीच नव्हतं. ती खूप खचली होती तीला काय करावे काहीच सुचत नव्हते. ज्या लोकांवर एवढी माया केली तीच लोक अशी वागणूक देतील असे तिच्या मनात स्वप्नातही आले नव्हते. खरंतर सगळं समोर असतानाही तिचा विश्वासच बसेना. तिच्या दु:खाला अंतच उरला नाही.
असं का? आणि कसं घडलं ह्याच विचारांत वर्ष निघून गेलं. त्यात अजून एक वाईट घटना घडली सुमनचे वडील हृदयरोगाने गेले. त्यामुळे सुमन आणखी खचली, आयुष्यात काहीच नविन घडत नव्हते तर परिस्थिती वाईटच होत होती. हे सगळे शेजारच्या काकूंना माहीत होते.त्या सगळंच बघत होत्या शेवटी त्यांनी विचार केला सुमनच्या आईला भेटायचं, त्यांनी सुमनच्या आईला तिच्या लग्नाचा विचार करायला सांगितले. पण त्यामुळे काही परीणाम झाला नाही. उलट सुमनच्या बहिणी म्हणायच्या हिला लग्न करुन काय करायचे आहे, काय येतं हिला, हिचा जन्म लोकांच्या सेवेसाठी झालाय, राहील इथे वाहिणीच्या हाताखाली. ह्या शब्दाने मात्र सुमनला पुर्णपणे हलवलं , तिला आता घरच्यांच वागणं आणि बोलणं पुर्णपणे कळायला लागलं होतं. आता आपलं कुणीच नाही आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्यालाच घ्यायला हवे हे तिला कळून चूकलं होत.
शेवटी परिस्थिती ला आणि आपल्याच लोकांच्या जाचाला कंटाळून सुमनने निर्णय घेतला. आणि कधीच घराबाहेर पाऊल न टाकणारी सुमन कुणाच्या शब्दाबाहेर न जाणारी सुमन, घर सोडून कायमची निघुन गेली कधीच वापस न येण्यासाठी.
उर्वरित पुढील भागात....................
तात्पर्य :- आपल्या माणसांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करा परंतु आपण स्वतःलाच विसरून चालणार नाही, मदत तेवढीच करावी जेवढी गरज आहे. गरजेपेक्षा जास्त सेवा कराल तर लोक तुम्हाला मुर्ख समजतील. सुमन खूप हुशार होती पण तिने दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्या गुणांना वाव दिला नाही . लोक तुमची गरज संपली की ओळख दाखवत नाही. मग ती परकी असो वा आपली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा